गोविंदराव टेंबे रचित ‘जयदेव’ संगीतिकेचे अभिगायन
“जयदेव’ संगीतिका ही गोविंदराव टेंबे यांची एक अद्भुतरम्य कलाकृती आहे.” अशी ओळख या संगीतिकेची करून दिली आहे. काहीशा अविश्वासाने आपण हे निवेदन वाचू लागतो आणि संगीतिका पाहू/ऐकू लागतो.. निदान माझे तरी तसे झाले होते. नाट्यगृहातून बाहेर पडल्या नंतर मात्र ती खरोखरच कशी केवळ अद्भुतरम्यच नाही तर अविस्मरणीय कलाकृती आहे, हे न कंटाळता ज्याला त्याला सांगू लागतो. माझे तसे झाले.
ही संगीतिका प्रथम १९५४ साली आकाशवाणीवर केवळ श्रव्य स्वरूपात सादर झाली. नंतर कोल्हापूर येथे १९६२ मध्ये तिचा नाट्यप्रयोग झाला. त्यानंतर १९७३ आणि १९७४ मध्ये नाट्यप्रयोग झाले. वर्ष १९७४ नंतर या कलाकृतीचा आविष्कार झाला नव्हता. आता एकदम २०२३ च्या जानेवारी सहा रोजी या संगीतिकेचे सादरीकरण झाले. ती नेटकेपणे सादर केल्या बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) व भीमसेन जोशी अध्यासनाचे आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत.
या १९७४ सालच्या प्रयोगात नायकाचे - जयदेवाचे- काम करण्याऱ्या पंडित सुधीर पोटे यांना तर अद्भुतपणाचे श्रेय मुख्यत: आणि भरभरून दिले पाहिजे. त्यांना हे स्वरनाट्य मुखोद्गत आहे – ते त्यांच्या रोमारोमात ते भिनले आहे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ घेऊन नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांची विशेष कार्यशाळा ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली. महाराष्ट्रातील संगीताचा, नाटकाचा हा अमोल ठेवा त्यांनी जपला, आणि आता ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला आहे.
युरोपिअन ऑपराच्या धाटणीचे ‘स्वरनाट्य’
जयदेव’ हे युरोपिअन ऑपराच्या धाटणीचे ‘स्वरनाट्य’ आहे. यात गद्य संवाद नाहीत – सांगायचे ते स्वरांतून, काव्यातून सांगितले आहे. याचे काव्य, संगीत सारे काही गोविंदराव टेंबे यांच्या अद्भुत प्रतिभेतून साकारले आहे. संगीतिकेतील पात्रे, प्रसंग व भावभावना व्यक्त करण्यासाठी गोविंदरावांनी विविध राग-तालांचा पूरक, अनुरूप वापर कल्पकतेने केला आहे.
समग्र भारतीय साहित्यावर, प्रयोगकलांवर ज्या ‘गीतगोविंद’मधील अष्टपदींचा प्रगाढ प्रभाव आहे अशा बाराव्या शतकातील विख्यात संस्कृत कवि जयदेवाच्या आयुष्यातील काही ठळक प्रसंग ह्या स्वरनाट्याच्या चार अंकांतून मांडले आहे.
व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व
काही सामाजिक आशयही गोविंदरावांनी व्यक्त केला आहे. वरकरणी ही जयदेवाची जगन्नाथ प्रभूवरील भाबडी भक्तिगाथा वाटली, तरी त्यात अनेक तात्विक विचारांच्या आशयाचे पदर आहेत - धर्मसत्ता आणि राजसत्तेपुढे न झुकता कलाकाराच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व जपणे, त्या काळातील सतीसारख्या क्रूर प्रथेला केलेला विरोध, माणसांतील असूया आणि मत्सराचा विपरीत परिणाम आणि कलाकाराचा आपल्या कलेवर असलेला दृढ विश्वास असे मुद्दे ह्या स्वरनाट्यात सुप्तपणे पण प्रभावीपणे मांडले आहेत.
सर्व कलाकारांनी आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत चोख बजावल्या आहेत. गायन आणि साथ सांगत खूप छान, प्रोफेशनल दर्जाचे, त्यांच्या विषयी खूप अपेक्षा निर्माण करणारे झाले. सादरीकरण बसूनच करायचे असल्याने अभिनयाला मर्यादा आहेत, पण त्या मर्यादेत देखील विद्यार्थी कलाकारांनी नैपुण्य दाखवून दिले आहे.
ललित कला केंद्राचे प्राद्यापक आणि विद्यार्थी ही संगीतिका नजीकच्या भविष्यात प्रत्यक्ष उभ्या नाटकाच्या स्वरूपात सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही संगीतिका पाहिल्या-ऐकल्यानंतर आता या ललित कला केंद्राच्या संचाचे नाटक पाहण्याची उत्सुकता आहे.
गोविंदराव टेंबे रचित ‘जयदेव’ संगीतिकेचे अभिगायन : श्रेय नामावली
संगीत मार्गदर्शक : पं. सुधीर पोटे (कोल्हापूर)
निर्मिती व मार्गदर्शन : डॉ. चैतन्य कुंटे
कलाकार :
विवेक सुतार, अबोली देशपांडे, होनराज मावळे, तेजस मेस्त्री, अभिषेक शिंदे, ज्ञानेश्वरी पंडित, कीर्ती धर्माधिकारी, मृद्गंधा कड, आशीष कदम, ओंकार लोहार, श्रीनिवास केंचे व ज्ञानराज होले
साथसंगत : संकेत लोहकरे (हार्मोनियम), कार्तिकस्वामी दहिफळे (तबला)
प्रकाश योजना : ओंकार सुपेकर
--
प्रा डॉ किरण ठाकूर
drkiranthakur@gmail.com
Comments
Post a Comment