जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा मराठी -इंग्लिश शब्दकोश

 जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा मराठी -इंग्लिश शब्दकोश 



बाजिंद किंवा सैराट या शब्दांचे अर्थ किती जणांना माहीत असतील? कुणास ठाऊक. या दोन शब्दांचा वापर  मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन चॅनेल यांच्यामुळे अचानक सुरू झाला तेव्हा व्हाट्सअप वर खूप लोकांनी एकमेकांकडे विचारणा केली:या शब्दाचा अर्थ काय? आधुनिक मराठी इंग्रजी शब्दकोशात अर्थ सहज सापडेना. जणू कुणालाच या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही असे चित्र निर्माण झाले. पण १८५७ मध्ये  जेम्स थॉमस मोल्सवर्थ नावाच्या ब्रिटिश माणसाला हे आणि असे शब्द हजारो शब्द माहित होते. त्याचे आणि अर्थ सुद्धा माहित होते. हा माणूस इंग्लंडहुन  भारतात आला तोपर्यंत त्याला मराठीचा एक शब्दही माहिती नव्हता. अशी भाषा आहे हे देखील त्याला माहीत नव्हतं. नोकरीचा भाग म्हणून ही आपली भाषा तो शिकला.  सुमारे ६०,००० मराठी शब्द गोळा करून, त्याचे इंग्रजी अर्थ संकलित करून त्याने एका अद्भुत शब्दकोशाची निर्मिती केली.  


त्यात आता अलीकडे सापडलेल्या या दोन शब्दांचेच अर्थ नमुन्यासाठी घेऊ:

1) बाजिंदा bājindā)

बाजिंदा bājindā a ( P) Clever, expert, adroit, adept, smart, proficient in scampish or in low practices and ways. Used with ambiguous implication (whether of commendation or reproach) like फरडा, बाट, बहाद्दर, जहामबाद, फाविंदा and countless other terms of the vulgar vocabulary.


 २. सैरट, सैराट sairaṭa, sairāṭa सैरट sairaṭa, सैराट sairāṭa a (स्वैर S) Self-willed, wilful, heady, headstrong, perverse, pig-headed, mulish. 2 Rude, coarse, harsh;—as a language. Pr. वांयी वैराट बोली सैराट. 3 Rude, barbarous, uncivilized;—as a person or a practice. इंग्लंड हून महाराष्ट्रात नोकरीसाठी आलेला हा ख्रिश्चन युवक त्यावेळी फक्त सोळा वर्षाचा असावा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये सोल्जर म्हणून तो लागला. लवकरच कर्नल पदावर पोहोचला. युद्धभूमीवर ईस्ट इंडिया कंपनी  किंवा नंतर राणीच्या इंग्लंड साठी लढणारा सैनिक म्हणून त्याने क्वचितच काम केले असेल. पण भारत विद्या अभ्यासक (इंडोलॉजीस्ट )  आणि शब्दकोशकार (लेक्सिकॉग्राफर) अशी विभिन्न प्रकारची कामं त्यांनी हाताळली.  

एप्रिल चार १८१६ रोजी जेम्स मोल्सवर्थ  यांना लेफ्टनंट म्हणून  बढती मिळालीभूदलात ते काम करू लागले. त्यापाठोपाठ  अन्न धान्य आणि लष्करी साहित्य पुरवठा विभागात ते काम करू लागलेहा सगळा कालखंड गडबडीचा असला पाहिजे. या काळात सोलापूर, कोल्हापूर आणि मुंबई अशा ठिकाणी ते कामात व्यग्र असले पाहिजेत. जून 3, १८१८  रोजी पेशवाई अस्ताला गेली या धामधुमीत ते नेमके काय करीत होते याचा उल्लेख दिसत नाहीमोल्सवर्थ आणि त्यांचे सहकारी   थॉमस कॅंडी यांनी  स्वतंत्रपणे छोटेसे पण खूप महत्त्वाचे काम सुरू केले होते. ब्रिटिश अधिकारी आणि प्रशासनात काम करणाऱ्या इतरांना मराठी म्हणून शब्दसूची इंग्रजी अर्थासह तयार करावी  हे काम  त्यांच्यावर सोपवले होतेते यांनी निष्ठापूर्वक केले. त्यातूनच मराठी-इंग्रजी शब्दकोश ही संकल्पना त्यांनी हाताळली

शब्दकोशाच्या निर्मितीची प्रक्रिया

शब्दकोशाच्या निर्मितीची प्रक्रिया  माहीत करून घेणे देखील रंजक आहे. मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या प्रथम आवृत्तीच्या पहिल्या पानावर याचा उल्लेख सविस्तर केलेला आहे. वर्ष १८२५ मध्ये हे काम सुरू झालं तेव्हा याचा शास्त्रशुद्ध विचार सुरु झालं. या चमूने  त्याचे शास्त्र आणि तंत्र अवगत केले. हळूहळू शब्दकोशकार  म्हणून अनुभव गाठीशी येत गेला

त्यांनी  ब्राह्मण शास्त्री पंडित  नेमले. शब्द, म्हणी, वाक्प्रचार, विशिष्ठ शब्दप्रयोग गोळा करायला त्यांनी सुरुवात केलीदुरूस्ती झालेले, अनावश्यक असलेले, भ्रष्ट वाटलेले, खूप बोजड किंवा खूप हलके-फुलके क्षुल्लक शब्द, उथळ भाषा अशा गोष्टींची  त्यांनी छाननी सुरु ठेवली. सुमारे पंचवीस हजार योग्य निवडक शब्द गोळा झाले. या पंडितांनी प्रत्येक शब्दाची तपासणी करून, चाळणी करून शब्द निश्चित केले. शब्दाच्या व्याकरणाचा अभ्यास केला. शब्दांच्या निर्मितीची संकल्पना तपासली. हा शब्द त्या-त्या भागापुरता प्रचलित आहे, की सार्वत्रिक आहे याचा विचार केला. शब्द  निश्चित झाला की त्याचे इंग्रजी प्रतिशब्द विचारपूर्वक ठरवले.  तो शब्द स्वीकारायचा की नाही याचा निर्णय केलाहे सर्व लिखित शब्द स्वतंत्रपणे सुरक्षित ठेवले, एका वेगळ्या खोलीत पंडितांशी  चर्चा करत संपादनाचे काम केले. शेवटचं महत्त्वाचं काम संपवून १८२८ उजाडलं.  महाराष्ट्र भाषेचा कोश  (The Dictionary of the Language of Maharashtra) या नावाने कोश  प्रसिद्धीसाठी सिद्ध झाला. पण छपाई मध्ये अडचणी आल्या. कोश प्रसिद्ध व्हायला पुन्हा उशीर होऊ लागला. या उशीराचा देखील मोल्सवर्थ  शास्त्रीजींनी फायदा करून घेतलाया काळामध्ये सुमारे १५,००० शब्दांची भर घालून त्यांनी चाळीस हजार शब्दांचा कोश तयार केला. तोपर्यंत १८३१ वर्ष उजाडलं होतं.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोल्सवर्थ यांना काम थांबवावे लागले. ते इंग्लंड ला परतले. आपण   ख्रिस्ती धर्माची उपासना करणारे असल्यामुळे  सैन्याचे काम करणे योग्य नाही असे त्यांनी मनाने घेतले. लष्करी सेवेचे त्यागपत्र देऊन टाकलेएवढेच नव्हे तर ब्रिटिश सरकारचे निवृत्ती वेतन सुद्धा आपण घेणार नाही असे शासनाला कळवून टाकलं

असं असलं तरी त्यांच्या कामाचे महत्त्व शासनाला इतके पटले होते की अधिकाऱ्यांनी त्यांना १८५१ मध्ये इंग्लंड हून परत बोलवून घेतलेमराठी-इंग्रजी शब्दकोशाची सुधारित आवृत्ती  संपादनाचे काम त्यांना पुन्हा करायला मिळाले. पुन्हा नव्या शब्दांची भर  घालून सुमारे साठ हजार शब्द असलेला कोश पूर्ण केला. सोलापूर, पुणे, बाणकोट किल्ला, मुंबई, दापोली, महाबळेश्वर आणि गुजरात मधले खेडा या ठिकाणी मुक्काम करत त्यांनी कोशाचे  काम पूर्ण केला

कोशाच्या कामासाठी मराठी  आणि इंग्रजी टाईप  कलकत्त्याहून करून आणाvaलागलेकोशाची छपाई झाली ती मात्र बॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये.

मराठी भाषेतील त्या वेळच्या तज्ज्ञ मंडळींनी कोशाचे कौतुक केले. त्याखेरीज मोल्सवर्थ शास्त्रीजींवर वर एवढे प्रेम केले की त्यांना ते आदराने  ‘मोलेसरशास्त्री किंवामोरेश्वरशास्त्री असे म्हणत, असं  इतरत्र आलेल्या उल्लेखावरून जाणवते. वर्ष १८६० मध्ये मोल्सवर्थ शास्त्री मायभूमी इंग्लंडला परत गेलेते अत्यंत श्रद्धाळू ख्रिश्चन होते. आपल्या धर्माच्या कामात देखील त्यांनी इंग्रजीमध्ये काही लेखन केले. आयुष्यभर ते अविवाहित राहिले

त्यांच्या कामाची दखल इंग्लंडमध्ये तेथील शाळा, कॉलेज, चर्च आदी ठिकाणी घेतली गेली नाही असे मला आढळून आलेब्रिस्टॉल या गावी एक भाड्याचं घर त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी घेतलं होतं असं माझ्या खटपटी मध्ये कळून आलं.  

त्या काळच्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा मृत्यूनंतर  त्यांच्या नात्यातील कोणीतरी कदाचित त्यांच्या थडग्यावर  त्यांच्या नावाचा उल्लेख केला असेल असे गृहीत धरून मी -मेलच्या माध्यमातून इंग्लंडमधील वर्तमानपत्रात चौकशी केली. मदत मागितली.    मला यश आले नाही
आजच्या पिढीमध्ये  त्यांच्या कामाचे महत्त्व थोडे तरी लक्षात यावे म्हणून छोटासा प्रयत्न केला. तेरा  जुलै २०२१ रोजी त्यांची  १५० वी पुण्यतिथी.  त्यांना श्रद्धांजली म्हणून पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जन  संज्ञापन विभागातर्फे एक संशोधन पत्रिका प्रकाशित केली. मराठी वृत्तपत्रे, आकाशवाणी आणि ऑनलाईन माध्यमांना विनंती केल्याप्रमाणे त्यानी देखील  मोल्सवर्थ यांना श्रद्धांजली वाहणारे लेख प्रकाशित केले. 

शब्दकोषाचे काम अद्याप संपलेले नाही

मोल्सवर्थ यांचे इतके महत्त्वाचे काम अद्याप संपलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा शब्दकोश अद्यापही ताजा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वर्ष १८५७ मध्ये शिळा प्रेस वर केलेलं काम ऑफसेट प्रिंटिंग च्या माध्यमातून १९७५ मध्ये शुभदा सारस्वत प्रकाशन यांच्या संस्थेने शरद गोगटे यांनी चालू ठेवलेमूळ ग्रंथाचे प्रकाशन ऑफसेट वर केल्यामुळे  मूळ  मजकूराची खिळे जुळवून छपाई करावी लागली नाही. त्याच्याही सहा-सात आवृत्त्या निघाल्यात्यानंतर निराली प्रकाशनाच्या श्री जिग्नेश फुरिया यानी शुभदा सारस्वत प्रकाशनाचा व्यवसाय १९९८ मध्ये विकत घेतला. आता print on demand चे तंत्र उपलब्ध झाल्यामुळे मागणी असेल तेव्हड्याच प्रती छापता येतात. या शब्दकोशाची विक्री अद्यापही चालू आहे.

इंटरनेट आणि युनिकोड चा  वापर करून देवनागरी लिपीमध्ये हा शब्दकोश पुन्हा सिद्ध करता आला. राष्ट्रीय ग्रंथालय आणि विविध संस्थांनी मदत केल्यामुळे डिजिटल  डिक्शनरीज ऑफ साऊथ एशिया प्रोग्राम यांच्या माध्यमातून ते काम अजूनही पुढे चालू ठेवले आहे. मुख्य म्हणजे तो विनामूल्य आहे. त्यासाठी ही लिंक पुरेशी आहे.:

https://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/


--

प्रा डॉ किरण ठाकूर
drkiranthakur@gmail.com

03, Indrayani, Patrakarnagar, off Senapati  Bapatroad, Pune 411016

Comments

Popular posts from this blog

A trap to control pests affecting plants and humans

Akira Miyawaki Forest blooming at Battis Shirala