पालघर केळवा शिरगाव पर्यटनाचा आगळा अनुभव





महाराष्ट्रातील पालघर हे अतिशय आकर्षक, रम्य,  सुरक्षित आणि कुटुंबातील सर्वांना आवडेल असं टुरिस्ट डेस्टिनेशन का आहे हे सांगण्यासाठी हे लिहीत आहेत. त्याला आधार आहे आमच्या नात्यातील सात अगदी घनिष्ट नात्यातील कुटुंबाचा गेल्या दिवाळीतील अनुभवाचा. 

मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असलेले पालघर शहर, तहसील आणि जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. मुंबई या आंतरराष्ट्रीय -राष्ट्रीय विमानतळा पासून फक्त पंचावन्न किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे.  पश्चिम रेल्वे, बोटीने, लोकल ट्रेन, एसटी, कार  अशा सर्व साधनांनी सहज जाता येईल अशा अंतरावर हे वसलेले आहे.  याचा तपशील कोणत्याही राज्य शासकीय/ पर्यटन विकास केंद्र, टुरिस्ट एजंट कडे सहज बघता येईल. 

या ब्लॉगपोस्ट चा उद्देश माझी निरीक्षणे आणि इतरांपेक्षा वेगळे अनुभव मुद्दाम नोंदविणे असा आहे. 

पुणे, नाशिक, औरंगाबाद, आणि बत्तीस शिराळा (सांगली जिल्हा ) येथील सात  कुटुंबातील एकूण चाळीस सदस्य आमचे ज्येष्ठ आप्त सौ सुनंदा आणि श्री भिमसिंग भामरे यांच्या बंगल्यावर दिवाळी साजरी करण्यासाठी नियोजन करून गेलो होतो. वय वर्ष सात ते ८0 या वयोगटातील स्त्री पुरुष त्यांच्या विस्तारीत दोन मजली ऐसपेस वास्तूमध्ये त्यांच्या पाहुणचाराचा आनंद मनसोक्त लुटला.  इतकी छान दिवाळी यापूर्वी आम्ही कोणीही साजरी केली नव्हती याविषयी आमच्या सर्वात एकमत झाले हे म्हटले की त्यात सर्व काही आले! 

मूळच्या खानदेश मधील असलेले हे कुटुंब पालघरला गेली अठ्ठावन्न वर्षे स्थायिक आहेत. प्राथमिक शाळेपासून स्थायिक झालेल्या मूळ श्री कै गुलाबसिंग भामरे, हे या कुटुंब प्रमुखांचे नावं.  या आद्य रहिवाशापासून ही मंडळी येथे राहात आहेत. दोघा चे छोटे कुटुंब हळूहळू वाढत गेले. पालघर ते बोरीबंदर- चर्चगेट या मुंबईतील उपनगरात गेली पस्तीस  वर्ष रोज चरितार्थासाठी अप डाऊन करणारे ही मंडळी आमची आप्तेष्ट. एकत्र कुटुंब म्हणून गुण्यागोविंदाने एकमेकांच्या सुखदुःखात नांदणारे. त्यांचा वंशवेल विस्तारत  गेला. एकमेकांच्या यशाचे कौतुक करण्याची त्यांची अहमहमिका एव्हडी मोठी की तो सर्व एका मोठ्या कादंबरीचा मजकूर होऊ शकेल!

आदिवासी संस्कृती आणि  पर्यटन व्यवसाय 

माझ्या आजच्या या लिखाणाचे उद्दिष्ट अशी कादंबरी लिहिणे हे नाही. तर पालघर येथे आम्ही २०२२ च्या दिवाळीत काय अनुभवलं हे सांगणे हा आहे. आमच्या या  वास्तव्यातील अनुभवावरून  वाचणाऱ्याने स्वतःच्या पर्यटनाचे नियोजन करावे आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाचा आनंद स्वतः लुटावा यामागची कल्पना आहे.

अरबी समुद्रावर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईपासून इतके जावं असलेलं पालघर शहर पूर्वी ठाणे या विस्तृत जिल्ह्याचा एक भाग होतं. मच्छीमारी करणारे कोळी, आदिवासी ठाकर, आणि कातकरी यांची मुख्य वस्ती असणारा हा सह्याद्रीचा भाग. पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती एक औगस्ट २०१४ रोजी झाली.  पालघर शहर, तहसील, आणि जिल्हा या नावाने विकसित होऊ लागले. येत्या काही काळात झपाट्याने विकास होऊन हा परिसर ओळखू येणार नाही इतका बदलेला  असेल या विषयी आता कोणालाही शंका राहिली नाही. 

या परिसराच्या विकासात येथील आदिवासी संस्कृती आणि विकसित होणारा  पर्यटन व्यवसाय आणि पर्यटन यांचा देखील फार मोठा वाटा आहे. येथील आदिवासींची वारली चित्रकला आता फक्त देशातच नाही तर विदेशात देखील ख्यातकीर्त झाली आहे. 

पर्यटन देखील  विकसित होते आहे. पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र शासन आणि खाजगी एजन्सी प्रयत्न करतात त्यांना यश मिळते आहे. आमच्यासारख्या जमेल- तेव्हा- जमेल - तसे पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना येथील वास्तव्यात आलेले चांगले अनुभव याचा देखील या विकासात मोठा वाटा असतो.  हे लक्षात घेता आम्हा  आप्तेष्टांना या पाच-सहा दिवसात आलेले अनुभव मला नोंदवून ठेवायसे वाटले.  

मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, आणि  इंदोर इत्यादी ठिकाणाहून आपापल्या कारने  आलेल्या मंडळींना एका बाजूने समुद्रकिनारा तर दुसऱ्या बाजूने सातपुडा-सह्याद्रीची रांग या मधून प्रवास करणे हाच मुळी मोठा आनंदाचा भाग असतो.  आम्ही आलो तेव्हा आपापल्या शहराच्या वातावरणामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता.  पालघर परिसरात पोहोचेपर्यंत कोवळे पिवळे सोनेरी ऊन हा आल्हाददायक अनुभव मिळायला सुरुवात झाली होती. एकदम अनपेक्षित आणि अवर्णनीय. मनात आलं प्रदूषण विरहित वातावरण हेच केवढे मोठे देणे येथील समाजाला लाभले आहे! 

दोन बस जातील एवढीच रुंदी असणारा रस्ता हा जिल्ह्याच्या अंतर्भागातून सरपटत जातो. खूप विस्तीर्ण, रुंद हायवे ग्रामीण भागात नाहीत.  त्यामुळे कोणाचे फार अडत देखील नाही.  आमचा प्रवास खूप आनंदात मजेत पार पडला. 

मोठी बाजारपेठ, रानमेवा, डोंगरी भाज्या 

पालघर आता मोठे शहर झाले आहे. मोठी बाजारपेठ आहे.  मॉल आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी भव्य इमारत झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून रहदारीची थोडी अडचण होते. पार्किंगसाठी जागा मिळणे थोडे दुरापास्त होते. आसपासच्या खेड्यापाड्यात मात्र सहज प्रवास करता येतो. गाडी थांबवून बाजारहाट देखील करता येतो. पालघरच्या आसपासच्या वाड्यावस्तीवरून आदिवासी रहिवासी डोंगर  दऱ्यातील भाजीपाला, फळफळावळ  पालघर, ठाणे आणि मुंबईला विक्रीसाठी न्यायला लागले आहेत. शासनाने उत्तेजन दिल्यामुळे हा रानमेवा जिल्ह्याच्या बाहेर देखील मिळायला लागला आहे.  थोडा इंटरेस्ट असेल तर रानमेवा आपल्या पर्यटनाच्या काळात देखील मिळू शकतो.  आपली नजर मात्र बारीक असणं आणि भाजीपाल्याची आणि रानातील फळांची माहिती असणं मात्र  आवश्यक आहे. सोबतीला स्थानिक जाणकार असायला हवा.  

मत्स्यप्रेमींसाठी अविस्मरणीय पर्वणी 

मत्स्यप्रेमीं साठी पालघरचा मुक्काम हा अविस्मरणीय ठरू शकतो. येथल्या हॉटेलमध्ये पापलेट, कोळंबी, ओले बोंबील पासून  सर्व प्रकारचे मासे मिळू शकतातच.  परंतु थोडा प्रयोग करणं, धाडस करणं ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी तर इथला मुक्काम ही पर्वणीच ठरते. 

आमची तशी ती पर्वणी ठरली.  भामरे कुटुंबीयांनी आमच्यासाठी पूर्ण पणे प्लॅन च करून दिला होता. त्यानुसार रात्री लवकर झोपून पहाटे चार वाजता आम्ही जागे झालो.  आवरून लगेच चहाची वगैरे वेळखाऊ वाट न पाहता आम्ही सातपाटी बंदरावर असलेल्या मासळी बाजारात पोहोचलो.  एकूण चौदा किलोमीटर अंतर होते.  पोहोचेपर्यंत चांगले उजाडत आलं होतं. बंदरावर आलेली मासळी बोटीतून  पुरुष मंडळींनी केव्हाच उतरवून घेतली  होती. मासे मोठ्या टोपलीत उतरवून मार्केटमध्ये पोहोचले होते. मासळींमधले एवढे वैविध्य आमच्यापैकी कोणीच पाहिले देखील नव्हते.  असे विविध प्रकारचे मासे खाण्याचा तर प्रश्नच नव्हता!

परंतु भामरे कुटुंबीयांनी आमच्या या प्रयोगाला देखील पूर्णपणे नियंत्रित केले होते. त्यांनी सांगितलं ते ते, तसं तसं आम्ही करत गेलो. प्रत्येक टोपली समोर उभं राहून चौकशी करत गेलो. प्रत्येकाकडे चांगले मोबाईल कॅमेरे होते. माश्याचे, विक्री करणाऱ्या कोळी मावशी, आजी यांचे मनसोक्त फोटो काढले. डोळे आणि कान  उघडे ठेवले तर खूप काही पाहता- ऐकता येतं हा अनुभव आला. 

फिश मार्केट च्या कोलाहलातला  आनंद 

मासळी बाजार संपूर्णपणे कोळी महिलांच्या नियंत्रणाखाली दिसत होता. त्यांच्याशी चौकशी करून, चर्चा करून, भाव ठरवून, त्याची साफसफाई करून आपापल्या पिशव्यात ताब्यात घेणं इथपर्यंतचे सगळे काम या भामरे कुटुंबाने करवून घेतले होते. या नंतरचं  मुख्य काम तर त्यांनीच ताब्यात घेतलेले होते. ते म्हणजे स्वच्छ केलेले मासे किचन मध्ये नेऊन पदार्थ काय आणि कसं करायचं ते ठरवायचं. ते ठरवून तशी अंमलबजावणी करणे आणि आग्रह करून खायला घालणे हा तर त्यांचा  गृहस्थ धर्माचा सर्वात मोठा आनंदाचा भाग. आणलेल्या मासळीचा फ्राय करणे की कालवण बनवणे हे त्यांनीच ठरवून तशी कार्यवाही केली. आमचे काम होते ते फक्त आडवा हात मारून पोट भरेपर्यंत खात राहणे!

गोंधळाचे वातावरण असले, कोलाहल माजलेला असला तर “फिश मार्केट”  असं वर्णन आपण करतो.  माझ्या वर्गात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला असेल तर “स्टॉप युअर फिश मार्केट” असं त्यांना मी बजावत असे. प्रत्यक्षात हा फिश मार्केट कसा असतो हे मी देखील कधी पाहिलेले नव्हते. पालघरच्या फिश मार्केटमध्ये पाहिले. 

कोळी बाजारात मुख्यत: महिलाच  असतात. समुद्रावर जाळ्यामध्ये मासे पकडून बंदरापर्यंत आणण्याचे काम पुरुष मंडळी करतात. त्याचे मार्केटिंगचे तितकेच महत्त्वाचे काम घरच्या महिला करतात.  या मार्केटच्या छोट्याशा जागेत पहाटेच्या वेळी एव्हडा गलका, एवढा कोलाहल की इतर कोणालाही काय चालले आहे याचा बोध होणे कठीण असते. व्यवहार करताना वाद होतो, तार स्वरात बोलणे होते.  त्यात ग्राहक, विक्रेते, मार्केटमधील इतर कर्मचारी या सगळ्यांचे जे काही बोलणे होते त्यात खरे कोणालाही सारे कळून घ्यायचे असायचे काही कारण नसते. तसे ते नसते. न कळल्यामुळे कोणाचे काही नुकसान होत नाही. 

या मार्केटमध्ये मी दोन अडीच तास केवळ निरीक्षणासाठी वावरत होतो.  खूप काही पाहायला मिळाले. दोघातिघींमध्ये चाललेली तार स्वरातील चर्चा आणि वाद, हमरी तुमरी पाहिली. ते करीत असताना त्यांच्या डोळ्यातला, चेहऱ्यावरील हावभाव पाहत असताना असे वाटून जाते की आता या दोघींमध्ये आयुष्यभर पुन्हा प्रेम संवाद होणे अशक्य होत असावे.  प्रत्यक्षात त्या मिनिटाचा जो वादाचा मुद्दा असेल तो संपला की परत प्रेमाने बोलणे  सुरू झालेले पाहायला  मिळाले.  या दोघींच्या वादाचा फायदा घेऊन तिसऱ्या कोणी लुडबुड करायचा प्रयत्न केला तर या दोघीनी त्या  तिसरीला नामोहरम केलेच समजा, अशी  माहिती एकाने जरा वेळातच मला दिली.

मार्केटमध्ये आलेल्या मासळीमध्ये व्हरायटी किती प्रकारची असावी याचा अंदाज आम्हाला आधी नव्हता.  छोट्या काही सेंटीमीटर लांबी-रुंदीच्या माशांपासून तीन- चार मीटर लांब मासे, वेगवेगळ्या रंगांचे, काही ग्राम पासून कित्येक किलो वजन असलेले मासे बघायला मिळाले.  त्या प्रत्येकाची चव कशी हे अर्थातच आम्ही कोणी सांगू शकणार नाही.  परंतु स्थानिक जाणकार ग्राहक नेमक्या टोपलीपाशी नेमक्या विक्रेतीपाशी थांबून हवं तेव्हडा बाजार चटकन खरेदी करून पिशवीत टाकून घरी परतत होता.  याचा अर्थ येथील प्रत्येक प्रकाराला गिर्‍हाईक नक्की होतं. आम्ही शहरी पाहुणे ग्राहक तसे नेहमी चाखत माखत  खाणारे. आमच्यासारखे पाहुणे खाऊन खाऊन खाणार किती याचा देखील अंदाज असणारे भामरे कुटुंबीय यांनी पिशव्या तुडुंब भरत कित्येक किलो मासळी भरपूर पैसे खर्च खरेदी केली. घरी जाऊन नंतर दोन-तीन दिवस त्या मासळीवर ताव मारत आम्ही पाहूणचार यथेच्छ झोडला. 

एवढे मासे आम्ही कसे पचवू अशी मला शंका होती.  पण कोणालाही त्रास झाला नाही.  तो होणार नाही अशी खात्री भामरे आजोबा-आजींनी आम्हाला आधीच दिली होती.  ती खरी ठरली, हे सांगणे नकोच. 


वेशभूषा, सोन्याची  आभूषणे,  माळलेल्या वेण्या 

लहान मोठ्या वयाच्या या कोळी भगिनींच्या वेशभूषा, सोन्याची  आभूषणे,  आणि त्यांनी  माळलेल्या वेण्या गजरे हे देखील माझ्या कुतुहलाचा,  कौतुकाचा विषय बनला. या साऱ्या कोळी भगिनी इतक्या नीटनेटकेपणाने मासळी मार्केट मध्ये खरेदी- विक्रीसाठी आलेल्या होत्या की तेथून त्या तशाच एखाद्या मोठ्या, इतर समाजाच्या कुटुंबातील लग्नाच्या रिसेप्शनला  देखील बिन दिक्कत जाऊ शकतील! 

मासळी न खाणाऱ्या लोकांना त्याची चव सोडाच पण वास सुद्धा सहन होत नाही.  आमच्यात असे काही थोडे होतेच. त्यामुळे ते या बाजारात किती वेळ तग धरून राहतील, काय बघतील याच्याविषयी मला स्वतःला थोडी शंका होती.  पण पहिली पाच सात मिनिटे सोडली  तर उरलेल्या सर्व वेळात आमच्या सर्वांच्या बरोबर नाकाला पदर किंवा रूमाल न लावता मासळीच्या टोपल्याजवळ निरीक्षण करत ते सगळे थांबले. मोबाईल वर फटाफट फोटो काढत राहिले. 

मासळीच्या टोपल्या बंदरापासून तर उपनगरापर्यंत ठिकठिकाणी लोकल ट्रेन मधनं जातात. मासळीचा एक डब्बा स्वतंत्र, वेगळा असतो.  त्यात कोळी भगिनी प्रवास करतात महाराष्ट्र बाहेरच्या मांसाहार न करणाऱ्या महिला या डब्यात या बाजूने प्रवेश करतात तेव्हा मासळी चा वास सहन न होऊन त्या त्याबद्दल च्या कॉमेंट्स करत करत नाकाला पदर किंवा रुमाल लावून असतात. त्या सोबतीला असल्या तर कोळी भगिनी “तुम्ही दुसऱ्या डब्यात का नाही प्रवास करत” असं सांगून बघतात. ते त्यांनी ऐकलं नाही तर स्थानिक कोळी महिला मग “मुंबई आमची आहे, आमच्या मुंबईत तुम्ही आलात कशाला? आलाच आहात तर आमच्या डब्यात शिरलात कशाला” असे सवाल जवाब चालू राहतात. एखाद्या वेळी टीकाकार अमराठी व अमहाराष्ट्रीयन महिलांना पुढच्या स्टेशनवर हात धरून ओढून उतरवून देण्या इतपत मजल जाऊ शकते, अशीही माहिती मिळाली..

केळवा शिरगाव बीचवर  भटकंती, डुंबण्याचा आनंद 

पालघर बीच चा मनसोक्त आनंद घेणारे लहान थोर समुद्राच्या पाण्यात डुंबताना पाहणे हा देखील मोठा आनंद असतो. 

आमच्या चार-पाच  दिवसाच्या मुक्कामात पाडव्या-भाऊबीजची एक संध्याकाळ सोडली तर रोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या बीचवर भटकंती हा  अगदी सुनियोजित असा कार्यक्रम होता. पालघर पासून १३  किलोमीटर अंतरावर केळवा बीच, सात  किमी वर शिरगाव हा दुसरा बीच

शांतपणे चालत किंवा जॉगिंग करत पूर्वेच्या उगवतीचा किंवा पश्चिमेच्या मावळतीचा सूर्य बघत चालणे हा मोठा आनंद आहे.  ज्यांना शक्य आहे त्यांनी पाण्यात डुंबले तर पाहिजेच.नाहीतर बाईक वरून, फोर किंवा सिक्स सीटर वरून बंदराचे खारं  वारं नाकातोंडावरून जाऊ दिलं पाहिजे. 

डुंबून आल्यानंतर लहान थोर,  आजोबा आजी असे सर्वचं  बटाटे वडा,  सुकी- ओली भेळ, मिसळ किंवा पाणीपुरी याचा आनंद घेतात. तो ते घेत असताना पाहिले की आपण देखील त्यात सामील न होणं, काही न खाणं,ती  चव न घेणं  केवळ अशक्य असतं हे वेगळे सांगायला नको.

हा आनंद आमच्यातील सगळ्यांनी मनसोक्त लुटला. त्यानंतर घरी जाऊन माशाचे कालवण किंवा कोकणचा शाकाहारी बेतही तितक्याच चवीने आम्ही खात होतो.  

पालघर संस्कृतीच्या आधारावर  सार्थ विश्वास  

पालघरच्या मुक्कामात आलेला आणखी एक खूप चांगला अनुभव सविस्तर लिहिणे आवश्यक वाटतं. 

आपापल्या गावी परतायच्या  आदल्या संध्याकाळी आमच्यातील एका कुटुंबातील बच्चे कंपनीने शिरगाव बीचवर मनसोक्त पोहून घेतलं.  सपाटून भूक लागली म्हणून बीच वरच्या एका छोटेखानी टपरीवर खाऊ खाऊन ते निघाले. सूर्य केव्हाच मावळतीला गेला होता.  अंधारात कार सुरू करून परत पोहोचायला रात्रीचे साडेसात आठ होऊन गेले. जेऊन झोपले. 

मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी या कुटुंबातील दोघांच्या लक्षात आले की मुलांचे काल संध्याकाळी भिजलेले कपडे परत आणलेलेच नाहीत.  बीच वरच्या त्या टपरीतल्या हॉटेल मध्येच राहिले होते. सगळ्यांचे हे कपडे महागा मोलाचे.  दिवाळीची भेटवस्तू म्हणून मिळालेले होते. दिवाळीची भेट म्हणून त्या वस्तूंना खूप मोठे महत्त्वाचे भावनिक मोल तर होतेच होते. हे लहानगे रडवेले झाले.  “हे सगळे आता गेले” या भावनेने मुक्कामी आलेले आम्ही सर्वच पाहुणे खूप हळहळलो. घरात उपस्थित असलेल्या सगळ्यांना चुटपुट लागून राहिली. 

बंगल्यातील फक्त एकच महिला अतिशय विश्वासाने “काळजी करू नका, त्या टपरीवर परत जा तुमच्या वस्तूला कोणीही हात लावलेला नसेल.  त्या सर्व वस्तू घेऊन तुम्ही परत याल” असे त्या सांगत होत्या. त्या होत्या पालघरच्या केटरिंग ची सेवा देणाऱ्या मावशी स्मिता चौधरी. पालघर परिसरातील पाड्यावरच्या कोकणच्या संस्कृतीच्या आधारावर त्या इतक्या खात्रीपूर्वक सांगत होत्या. 

मुलांचे वडील आणि काका लगेच निघाले. भेटवस्तू परत मिळतील याची खात्री अजिबात वाटत नव्हती.  पण पर्याय नव्हता. एक ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून सात किलोमीटर गाडी चालवत ते पोहोचले. काय आश्चर्य! सर्व नवे कोरे कपडे एका मोठ्या दोरीवर चांगले पिळून वाळत टाकलेले होते. वाऱ्यामुळे  पूर्णपणे वाळलेले होते. चौधरी  मावशीचा विश्वास किती सार्थ होता!

















--

प्रा डॉ किरण ठाकूर

drkiranthakur@gmail.com

08.11.2022

Comments

Popular posts from this blog

A trap to control pests affecting plants and humans

Akira Miyawaki Forest blooming at Battis Shirala