पत्रकार मनोहर सप्रे याचे पुस्तक: होल्टा: आठव, अनुभव, अनुभुती
होल्टा: आठव, अनुभव, अनुभुती.
होल्टा हा शब्दही माहीत नव्हता, पण वाचायला घेतलं. वाचलं. तेव्हा मात्र आपण त्याच्या याआधीच्या किती चांगल्या साहित्याला मुकलो होतो याची जाणीव झाली. कोकणातून आलेला, माझ्यापेक्षा काही वर्षांनी छोटा असलेला, हा पत्रकार किती प्रांजळ होता याची कल्पना मला आत्ता आली.
बरोबरीच्या इतर मुलांसारखी कोणतीही महत्त्वाकांक्षा नसलेला, बातमीदार म्हणून इतर कोणाशी स्पर्धा करावी, आयुष्यात काही साध्य करावं, यासाठी धडपड करावी असं वाटू न देणारा, कुठलीही खंत कधी न वाटलेला असा हा वार्ताहर-उपसंपादक म्हणून कार्यरत होता. “संध्या” खेरीज दैनिक “सामना” मध्ये काम केलेला. जाहिरात संस्थेत लिहिणारा. उत्तम जाहिराती साठी भाषांतरकार असलेला. असा मनोहर. नेहेमीच मितभाषी, पत्रकार संघटनांच्या राजकारणात चबढब न करणारा असा हा मनोहर सप्रे. त्याची साठी उलटून गेल्यावर मला कळतं की तो इतके छान साधे सोपे लहान लहान वाक्यांचे मराठी लेखन करतो आहे. मला त्याच्या सोप्या मराठीचे, निरीक्षणक्षमतेचे खूप अप्रूप वाटले.
मूळच्या खानदेश च्या असलेल्या मला रत्नागिरी जिल्ह्यातील मनोहरचं जन्मगाव वेरवली खुर्द, तिथलं वातावरण, लोकांचे विषय हे सगळं नवंच. कोंकण रेल्वे आल्यानंतरची स्थित्यंतरे, मनोहरने जगलेलं पुणं, गावच्या मातीची ओढ, शेती करायची खुमखुमी, त्यात यश न आल्याने न खंतावता आपल्या कुटुंबाला जगण्याचं कसं बळ दिलं हे कुठलाही अभिनिवेश न ठेवता त्याने मांडलं आहे. पुत्र, सून दोघांना दोन वेगवेगळ्या प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करता येईल इतपत --म्हणजे खूपच प्रोत्साहन त्याने दिलं. ..” एक समाधानी आयुष्य मला मिळालं . मी सुखी प्राणी आहे. .. पण माझा गाव मला खुणावत असतो .. “ असं तो म्हणतो.
मला मात्र त्याच्यातील लेखन क्षमता दिसायला लागली आहे. कोंकण च्या मातीत गेल्या सहा दशकात घडत गेलेल्या बदलाचा तो तटस्थ साक्षीदार आहे. या बदलाच्या शाश्वत नोंदी करण्याचे खूप काम तो करू शकतो.
एवढा गुणी प्रांजळ पत्रकार आपल्या अवतीभोवती वावरतो याची दखल आपण इतक्या उशिरा आज घेतो आहे याची आता खंत वाटली. असे का घडले असावे याचा विचार केला तेव्हा त्याचे साधे सरळ कारण असे की मी इंग्रजी माध्यमात, तेही यु एन आय सारख्या वृत्तसंस्थेत काम करणारा बातमीदार, तर मनोहर सायं दैनिकात. माझ्या माध्यमाच्या गरजा आणि त्याच्या गरजा पूर्णपणे भिन्न. त्यामुळे रोजच्या कामाचे स्वरूप वेगळे, बीट वेगळे, डेडलाईन्स वेगळ्या. त्यामुळे मी रोज काय काम करतो, किती वाजता काम संपवतो हे त्याला माहीत असणे शक्य नाही. त्याची माहिती मला नसायची. आम्ही एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेण्याचे कारण नव्हते. माझ्या बातम्या त्याने आणि त्याच्या मी वाचणे हे देखील कधी घडले नाही.
त्याला आता इलाज नाही. त्याने आतापर्यंत केलेल्या कामाला दाद देणे हे मी नक्की केले पाहिजे. यापुढे तो जे करणार आहे त्याची दखल घेतली पाहिजे. त्याच्या कामाचे एकदोन नमुने नव्या वाचकांना सादर केले पाहिजे
सोशल मीडिया वर हे शक्य आहे.ते आता करतो.
त्या आधी: होल्टा म्हणजे म्हणजे काय?
पिकलेले आंबे आपोआप झाडाखाली पडतात; पण होल्टा मारून आंबा पाडण्याची वेगळीच गंमत. होल्टा म्हणजे लाकडाच्या फांदीचा तुकडा, साधारण दोनअडीच फूट लांब. चांगला वजनदार असला की होल्टा छान काम करतो. भालाफेक करण्यासाठी खेळाडू पोझिशन घेतो तसाच उंच झाडावर होल्टा मारताना हात जमिनीकडे नेत पोझिशन घ्यायची. फांदीच्या टोकावर कुठेतरी एखादा आंबा पिकायला लागलेला दिसतो. त्यावर झटकन झेप मारावी आणि पटकन आंबा पकडावा असे वाटते. वाऱ्याने फांदी हलते तेव्हा फांदीबरोबर हा आंबा पडावा असं वाटतं, कधीतरी म्हणजे अगदी त्याचवेळी तो खाली पडू शकतो. त्याचे ताजेपण पाहण्याची मजा काही औरच असते. होल्टा मारून एक दोन वेळा प्रयत्न केल्यानंतर नेमका तोच आंबा खाली पडून आपल्याला मिळाला, तर जो आनंद असतो तो आनंद ज्याने मिळवला आहे आणि मनात साठवला आहे, त्यालाच त्याची मजा.
--
जीवन संघर्षाचे नमूने
--
मनोहर सप्रेच्या च्या “आठवणीतील माणसं” हे प्रकरण चटका लावून जातं . ही आणि अशी माणसं त्याकाळात पुण्यातील सर्वच बातमीदारानी पाहिली असतील. काही मी देखील पाहिली. पण त्यांच्या विषयी चार ओळी कुणी लिहिल्या नसाव्या. मनोहरला ही माणसं दखलपात्र वाटली. त्यांच्या साठी वेगळी वाट करून परिश्रम करून त्यानं त्यांच्या विषयी सहृदयतेने लिहिलं. हे त्याचं वेगळेपण.
नमुन्या दाखल दोन-तीन वेगळ्या माणसांची ओळख त्याच्याच शब्दात देण्याचा मोह आवारत नाही.
“सगुणा काळीकूट्ट फक्त चार फूट उंचीची मुलगी. तिच्या अगदी छोट्या चेहऱ्यावरून तिच्या वयाचा अंदाज यायचा नाही. ती हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसून नव्या पुलावर बसायची. लोकांना तिची माहिती होती. नव्या पुलावर तिच्याभोवती नेहमीच गराडा असायचा. एक पैसा, दोन पैसे अशी नाणी लोक तिला द्यायचे. ती हसूनखेळून असायची.
गर्दीतला कोणीतरी तिला म्हणायचा, सगुणी माझ्याशी लग्न करते का? ती तिच्या विचक्या आवाजात काहीतरी उत्तर द्यायची. आणि लोक हसायचे. मी कधी नव्या पुलावर गेलो तर एक दृष्टीक्षेप टाकल्याशिवाय जायचो नाही. सगुणाला रोज कुणीतरी अशी मागणी घालायचं. ती गंमतीने हो म्हणायची. तिचं लग्न काही झालं नाही. कोणी तिच्या गळ्यात माळ घातली नाही. भीक मागतच ती अखेर काळाच्या उदरात गडप झाली.”
माणसं असे का वागतात? मनोहर त्याच कारण सांगत नाही. विश्लेषण देत नाही. वाचकालाच विचार करायला भाग पाडतो. दुसऱ्या एखाद्या माणसाची ओळख तो करून देतो.
“लोणावळ्याला गेलो होतो. जत्रा होती. तिथे एका स्टॉलकडे लक्ष गेलं. बाहेर एक छायाचित्र होते. एक नुसता ठोकळा होता तो. हात नाही, पाय नाही. त्याचं नाव आठवत नाही. जत्रेत खेळ दाखवून तो पैसे मिळवायचा. हातपाय नसलेल्या त्याच्या देहाचे प्रदर्शन करून त्याचं कुटुंब पोट भरत होतं.
मला त्याच्याबद्दल कुतुहूल वाटलं. मी पत्रकार आहे, तुझ्याशी बोलायचं आहे म्हणालो. त्या आधी त्याचा खेळ बघितला. जिभेच्या आधारे तो खेळ करायचा. म्हणजे पेन जिभेने उचलायचा. त्यानं लिहायचा. काडेपेटीवर काही पेटवायचा. एखादं वाद्य वाजवून दाखवायचा. काही तरी करून तो लोकांना खूष करायचा. जत्रेत रोज त्याची कमाई व्हायची.
त्यानं नंतर भेटायला बोलावले. पत्रकार भेटणार म्हणून गुळगुळीत दाढी करून बसला होता. मला सर्वात आवडलं ते त्याचं हास्य. तुझे शरीर हे असे का झाले वगैरे विचारून त्याला दुखवावेसे वाटले नाही. जीवनाकडे तो कसा बघतो हे जाणून घेणे मला महत्त्वाचं वाटलं. नियतीवर त्याचा मुळीच राग नव्हता. जे जीवन मिळालं ते आहे तसं त्यानं स्वीकारलं होतं. त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबीयांच्या तोंडी घास जायचा. सगळे त्याची सेवा करायचे. पुढे काही वर्षांनी तो चतुःशृंगीच्या जत्रेत भेटला. तेथेही तिकीट काढून त्याला भेटलो. त्याने ओळख दिली. “कैसे हो साब!" या त्याच्या एका वाक्याने मी आनंदलो. त्यानं ओळख ठेवली याचंच मला अप्रूप वाटल.”
जीवन जगण्यासाठी लोक किती संघर्ष करतात याची अनेक उदाहरणं माझ्या मनाच्या कोपऱ्या बंद झाली होती. दुसऱ्याचं दुःख पाहून डोळ्यात टचकन पाणी यायचं. असाच एक माणूस सुंदर शेट्टी, तोही पोट भरण्यासाठी तासंतास सायकल चालवायचा. १०० -शंभर तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रयोग करायचा. असे अनेक सुंदर शेट्टी तेव्हा ठिक ठिकाणी दिसायचे.
शिवाजीनगरात मोकळ्या पटांगणात गोल रिंगण करून बांबूचं कुंपण असायचं, जमीन चांगली चोपून तयार केली जायची. कुणाच्या तरी हस्ते गळ्यात हात घालून सुंदर शेट्टी सायकल चालवायला सुरुवात करायचा. त्या छोट्या मंडपात गोल गोल फेऱ्या मारत राहायचा. सलग चार दिवस तो हा प्रयोग करायचा. त्या काळात लोकप्रिय असलेली गाणी लावलेली असायची. बघे उभे असायचे, पैसे जमवण्यासाठी त्याचा सहकारी असायचा. हा सहकारी त्याच्याबरोबर सतत फिरत असायचा. आणखी एखादा मदतीला असायचा. तो अधूनमधून त्याला पाणी द्यायचा. थोडी गर्दी झाली की सुंदर शेट्टी सायकलवर खेळ करायचा, "आएगा आएगा एक छैल छबीला आएगा" या प्रकारचं गाणं लाऊड स्पीकर वर चालू व्हायचं.. तो त्या तालावर सायकलवर उभं राहून नाचायचा. हँडलवर उभं राहून प्रेक्षकांना अभिवादन करायचा. रेलून उभा राहायचा. लोकांना आनंद द्यायचा. लोक पैसे द्यायचे, ते त्याचा सहकारी गोळा करायचा. दुसरा सहकारी त्याला अधून मधून पाणी प्यायला द्यायांचा. रात्रीचा सुद्धा सायकल चालवायचा. काही शंकेखोर शंका घ्यायचे. रात्री येऊन खात्री करून घ्यायला पाहिजे म्हणायचे. चार दिवस होत आले की एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते सत्कार होऊन तो कार्यक्रम संपवत असे. पुढचा असा विक्रम कोठे होईल, केव्हा होईल याची घोषणा करीत समाप्ती होई.
पत्रकार या नात्याने मनोहर असंख्य सान थोरांना भेटला. त्यांच्या मुलाखती त्याने लिहिल्या. दोनशे सात पानाच्या “ होल्टा” मध्ये त्यांची ओळख त्याने करून दिली आहे. ते सगळंच वाचनीय आहे. मला मात्र लक्षात राहतील ते सगुणा, हातपाय नसलेला तो जिद्दी, आणि सायकली वर रेकॉर्ड करणारा.
--
वनराईचे अध्यक्ष रवीन्द्र धारिया यांनी आपल्या प्रतिसादात नोंदिवलेलं पटतं : ‘होल्टा ’किंवा ‘साकव’ हे फक्त शब्दच नाहीत, तर ती एक अनुभूती आहे. ती वाचकाला देणाऱ्या संपादक प्रज्ञा जांभेकर, अक्षर जुळणीकार शुभांगी एंटरप्रायझेस आणि मुखपृष्ठ आर्टिस्ट वैभव संतोष कोंढेकर या सर्वांचे अभिनंदन.
--
होल्टा
आठव, अनुभव, अनुभूती
लेखक: मनोहर सप्रे
इमेल: manoharsaprepune@gmail.com
रुपये ३००, ISBN 978-81-950188-3-3
सदामंगल पब्लिकेशन, मुंबई
प्रा डॉ किरण ठाकूर
इमेल: drkiranthakur@gmail.com
लेखकाचे नाव : मनोहर सप्रे
--
Comments
Post a Comment