प्रा डॉ सुधाकर विठ्ठल चव्हाण आणि वारली चित्र कला
पुण्यातील ख्यातनाम कला शिक्षक आणि कलाकार प्रा डॉ सुधाकर विठ्ठल चव्हाण यांनी अलीकडेच वयाची सत्याहत्तरी पार केली आहे. आजही ते रोज नित्य नियमाने रंगाशी, ब्रशने, चारकोल किंवा पेन्सिलने खेळत असतात. त्यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ कलाकार इतरही आहेत. पण चव्हाण सरांचे आगळेपण आहे ते त्यांच्या सतत चालणाऱ्या नवनवीन शिकण्याच्या धडपडीचे, नवे शिकण्याचं, शिकवण्याचं आणि संशोधन करण्याचे व्रत चालू ठेवण्याच्या वृत्तीचं .
कोरोना च्या साथीत ते स्वतः सापडले. आजारपणात घरातच पडले. पाठीचा मणका दुखावला. पाय पण जायबंदी झाला. वॉकर वापरून कसेबसे जेमतेम घरात पावले टाकू शकत होते. त्यातच पत्नी सौ वसुधा यांना देखील कॅन्सरने घेरले. पण या दाम्पत्या ने आपली धडपडी-प्रसन्न वृत्ती कायम ठेवली. आपल्या पीएचडी चे काम सतत चालू ठेवले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात चव्हाण सरांनी आपला प्रबंध सादर केला तेव्हा या क्षेत्रातल्या जाणकारांना आणि चव्हाण कुटुंबीयांच्या आप्त स्वकीय, मित्रपरिवाराला सुखद आश्चर्याचा धक्का बसला नाही. कारण चव्हाण सर कलेची सेवा, आपला अभ्यास, अध्ययन, अध्यापन आणि संशोधन चालूच ठेवणार याविषयी कोणालाही शंका नव्हती. सगळ्यांना थक्क केलं ते मात्र त्यांच्या प्रबंधाच्या विषयाने, त्या विषयावरचा सखोल अभ्यास करण्यासाठी भ्रमंती करणे आणि ग्रंथांचा धांडोळा घेणे यामुळे. आपल्या विध्यार्थ्यांना आणि वाचकाला दिशा देण्याचे त्यांचे कसब यामुळे सगळेच प्रभावित होतात असा अनुभव सगळ्यांना आधीपासूनच होता. त्यामुळे या प्रबंधाच्या सोप्या रसाळ भाषेमुळे नवे संशोधक आणि वाचक प्रभावित होतील यात नवल ते काय!
त्यांचा पी एच डी चा विषय होता: “21 वे शतक आणि वारली चित्रकला: 21 व्या शतकाचा वारली चित्रकलेवर झालेला परिणाम याचा चिकित्सक अभ्यास. ” या विषयावर आर्ट अँड व्हिज्युअल आर्ट या विद्याशाखे अंतर्गत त्यांनी प्राचार्य डॉ डी आर बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले.
गेल्या चार पाच वर्षात त्यांनी केलेल्या संशोधनाचे सार थोडक्यात असे सांगता येईल:
वर्ष १९७६ पर्यंत वारली चित्रकला फारशी प्रकाशात आली नव्हती. सह्याद्रीच्या डोंगर रांगात ठाणे जिल्ह्यातील डहाणू, पालघर, मोखाडा , तलासरी, जव्हार, आणि विक्रमगड या तालुक्याच्या परिसरात वारली आदिवासी स्त्री पुरुषांनी विकसित केलेली ही कला. ती धार्मिक परंपरा, निसर्ग, आणि दैनंदिन जीवनाचे वास्तव यांच्यावर आधारलेली असे. चित्रातील प्रेरणा धार्मिक हेतूशी संबंधित असली तरी देव देवता आणि समाज जीवन तसेच आजूबाजूची परिस्थिती यांचे प्रत्येकारी दर्शन तिच्या आविष्कारात घडते, एव्हढीच या कलेची तेव्हा ओळख सुरुवातीला होती.
चित्र निर्मितीची माध्यमे, विषय, आणि तंत्र यात काळानुसार बदल होत आहेत. आता जागतिकीकरण आणि बहुतालची झपाट्याने बदलणारी परिस्थिती यावर वारली कलाकारांची प्रखर प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते. त्यातूनच नवीन प्रतीके त्यांच्या चित्रात दिसू लागली आहेत.
परिस्थितीनुरुप मूळ चित्र परंपरेत बदल होत आहेत. हे बदल मूळ चित्र परंपरेची केलेली प्रतारणा नसून बदलत्या काळानुसार वारली कलाकारांनी दिलेला तो प्रतिसाद आहे असा निष्कर्ष चव्हाण यांनी काढला आहे.
देशातील आदिवासी कला, महाराष्ट्राची वारली चित्रकला, मध्य प्रदेशातील गोंड आणि भिल चित्रकला, छत्तीसगडमधील मुरिया , गोंड चित्रकला, ओरिसाची सौरा चित्रकला आणि गुजरात ऱाथुवा जमातीची पिठोरा चित्रकला या सर्वांचा चव्हाण सरांचा मुळापासूनच अभ्यास होता. पी एच डी च्या निमित्ताने त्यांनी वारली चित्रकलेचा पुन्हा एकदा सखोल अभ्यास हाती घेतला. केला आणि ही पुरातन कला आता कोणत्या स्थितीत आहे याचा सखोल धांडोळा घेतला.
वारली चित्रकलेचे मूळ लग्न व इतर धार्मिक विधी प्रसंगी वारली जमातीत घराच्या म्हणजे त्यांच्या झोपडीच्या दर्शनी भागावर आणि घराच्या आतील विभागाच्या दुभाजकासारख्या शेणा- मातीने सारवलेल्या भिंतीवर तांदुळाच्या पिढीच्या द्रावणाने ही चित्रे काढली जातात.
चित्र काढण्यासाठी बांबूच्या टोकदार काडीचा वापर केला जातो.या घराच्या आतील दुभाजक भिंतीवर लग्नप्रसंगी अत्यंत आवश्यक असणारा लग्न चौक व देव चौक काढतात. हा लग्न चौक म्हणजे वारली चित्रकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना समजला जातो. लग्न चौकाच्या शेजारी देवचौक व आजूबाजूला दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारी इतर चित्रे तपशीलवार काढली जातात.
चित्र काढण्याचा मूळ अधिकार स्त्रीचाच परंपरेने ही चित्र काढण्याचा अधिकार वारली जमाती मधील सुवासिनीनाच असतो. सुहासिनींबरोबर लग्नविधी संबंधित गाणी म्हणत चित्रातील तपशिलाबाबत सूचना देणाऱ्या स्त्रियांना “धवलेरी” म्हटली जाते. अशी अगदी प्राथमिक माहिती देत देत वारली चित्रकलेचा 2021 पर्यंतचा इतिहास डॉ चव्हाण यांनी आपल्या प्रबंधात मोठ्या रंजकतेने मांडला आहे.
जिव्या मशे यांचे योगदान जिव्या मशे या वारली कलाकाराने ही कला प्रथम नावारूपाला आणली. फक्त ठाणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
जिव्या मशे यांच्या चित्रांचे प्रदर्शन कै भास्कर कुलकर्णी यांच्या प्रयत्नामुळे मुंबई येथे चित्रांच्या प्रदर्शनात प्रथम झाले. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे झालेल्या प्रदर्शनाच्या व्यावसायिक यशामुळे संपूर्ण वारली समाजात एक प्रकारचे परिवर्तन सुरू झाले.
आतापर्यंत वारली स्त्री-पुरुष केवळ शेतमजूर, घरगडी, कारखान्यातील कामगार, हमाली अशा अंग मेहनतीच्या कामावर आपले पोट भरत असत. या कामापेक्षा पारंपरिक चित्रशैलीतून उदरनिर्वाह करता येतो अशी भावना प्रथम निर्माण झाली ती भास्कर कुलकर्णी आणि श्रीमती पुपुल जयकर यांच्या प्रयत्नामुळे. त्यांनी जिव्या मशे आणि इतर कलाकारांना दिल्ली येथे सन्मानपूर्वक आमंत्रित केले.
या व अन्य कलाविषयक वेगवेगळ्या उपक्रमामुळे वारली चित्रकारांनाराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू लागले.
वारली कलेचे मूळ स्रोत
वर्षानुवर्ष जतन केलेल्या परंपरा चालीरीती,परस्पर संबंधांच्या कल्पना, चालीरीती, जीवनशैली, देव देवतांच्या संकल्पना, आणि निसर्ग या विषयांवर निगडित वारली कला विकसित झाली आहे. अत्यंत उत्स्फूर्त चित्राविष्कार, प्रतिकात्मता आणि वर्णनात्मकता हीच वैशिष्ट्ये आदिम चित्रकलेत दिसून येतात.डॉ चव्हाण यांनी नोंद केल्याप्रमाणे आदिवासींची धर्म ही संकल्पना लौकिक अर्थाने फारशी विकसित नाही.. मात्र निसर्गाची रौद्र भयंकर व तितकीच सुंदर रूपे, परिसरातील प्राणी, पक्षी, झाडे, नद्या, आणि डोंगर अशा निसर्गाच्या विविध रूपांबद्दल भीती आणि उत्सुकता, तसेच देव देवतांच्या संकल्पना याविषयी आदिवासींचे एक नाते निर्माण झालेले असते. आरंभी केवळ या नात्याचेच प्रतिबिंब वारली कलेत दिसून येत असे.
वारली जमातीचा कलात्मक वारसा
आता हळूहळू वारली जमातीचा कलात्मक वारसा जगभर परिचित होत आहे. देव देवतांची शिल्पे, दाग दागिने, दैनंदिन वापरातील वस्तू , मातीची भांडी ही त्यांची सर्व निर्मिती कलात्मक आहे. देवताच्या मूर्ती, दगड, लाकूड,आणि धातू या मध्ये घडविलेल्या असतात. डॉ चव्हाण यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार या सर्वच आदिम कलांचे माध्यम नैसर्गिक रंग हेच आहे.
पुराश्म युगातील भीम बेटका येथील गुहा समूहातील चित्रे पाहिली तर त्यांचे वारली कलेशी पुष्कळ साम्य आढळते.
वारली कलेतील माध्यम आणि तंत्र
१. वारली जमातीत घराच्या म्हणजे झोपडीच्या दर्शनी भागावर आणि मुख्य भिंतीवर चित्र काढतात. झोपडीच्या भिंती पातळ बांबूच्या काड्या किंवा कारवी या वनस्पतीच्या काड्यांनी तयार केलेल्या असतात. त्या शेण मातीच्या मिश्रणाने लिपल्या जातात. यानंतर भिंती शेणाने सारून घेतात. काही वेळा शेणाएवजी रानातील तांबड्या मातीने देखील सारवून भिंत तयार केली जाते. अशा गडद पार्श्वभूमीवर तांदुळाच्या पिठीच्या द्रावणाचा वापर करून चित्र काढले जाते.
२. वारली चित्र काढण्यासाठी एक दृश्य भाषा परंपरेतूनच विकसित झाली आहे. मानवी आकृती, प्राणी, पक्षी, आणि निसर्ग यांचे चित्रण करण्याची त्यांची एक खास पद्धत आहे. त्रिकोण आणि गोल या आकारातून विविध प्रकारे हालचाली दाखवणाऱ्या मानवाकृती. पशु, आणि पक्षी ते तयार करतात. दोन त्रिकोणाची टोके जोडून प्राणी, पक्षी आणि मानवाकृती करताना मूळ वैशिष्ट्य कायम राहतात. चित्रातील काही गोष्टी प्रतीकात्मक दाखवतात.
चित्रात प्रत्येक वेळी जसे दिसते तसेच काढले जात नाही; तर जसे माहित असते तसे चित्रात दाखवतात. उदाहरणार्थ: विहिरीवरील दृश्य किंवा धान्याचे खळे हे चित्र काढताना काही भाग वरून बघितल्या सारखा तर काही भाग एका बाजूने बघितल्या सारखा दाखवले जाते.
झोपडीच्या आतील दृश्य, कणगीतील धान्य , आकृतीच्या डोक्यावर टोपलीत असणाऱ्या वस्तू,’ हातातील पिशवीत असणाऱ्या वस्तू दाखवल्या जातात. या प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाहीत पण त्या आहेत म्हणून वारली चित्रात या गोष्टी दाखवतात यालाच “क्ष किरण चित्र" म्हणतात.” असं बारकावे डॉ चव्हाण समजावून सांगतात.
एक चित्र अनेक प्रसंगाची गुंफण
प्रत्येक वारली चित्र म्हणजे अनेक प्रसंगांची गुंफण असते. त्यात एक सुसंगत विचार असतो. चित्रातील विषय लग्न समारंभ व संबंधित विधी, शेती व जनजीवन, लोककथा, लोकगीते, देव देवता अशा प्रकारचे असतात.
बदलत्या परिस्थितीमुळे वारली चित्रकला फक्त धार्मिक हेतूसाठी किंवा जमातीपुरता न राहता तिला व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक व्यक्ती, संस्था, आस्थापना, स्वयंसेवी संस्था, शासन अशा विविध स्तरावर वारली चित्राला मागणी असल्यामुळे मागणीनुसार वेगवेगळे विषय चित्रात येऊ लागले आहेत.
अगदी अलीकडे पर्यंत केवळ डोंगर, नदी, झाडे, पाने, फुले यांची चित्र काढणारे आदिवासी आता स्वतःच्या अभिव्यक्ती वर चित्र काढू लागले आहेत. एवढेच नव्हे तर आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग यावर स्वतःची प्रतिक्रिया देणारी चित्रे देखील काही सर्जनशील वारली कलाकारांनी सादर करायला सुरुवात केली आहे.
वारली कलेचा परिचय देशभर आणि देशाबाहेर झाला असल्याने कलाकारांनी जगभर अनेक ठिकाणी भेटीगाठी केल्या. इतर कलाकारांची कला पाहिली. प्रदर्शनात भाग घेतला. या सगळ्या अनुभवाचा परिणाम स्वाभाविकपणे स्वतःला भावणाऱ्या विषयांवर चित्र निर्मिती करण्यात झाली.
मार्केटच्या मागणीप्रमाणे कलाप्रकार सादर करणे हे तर चालू राहिलेच. परंतु स्वतःला भावलेले विषय आणि अनुभवावर आधारलेले चित्र हे देखील वारली कलाकार करू लागले.
जागतिकीकरणाचा परिणाम
जागतिकीकरणामुळे जगभर घडणाऱ्या गोष्टींची माहिती, टीव्ही, मोबाईल व इंटरनेट द्वारे देखील या आदिवासी कलाकारांना होऊ लागली आहे. त्यातून हे कलाकार आपली नवी कला सादर करण्यासाठी प्रेरित व्हायला लागले आहेत
जिव्या सोमा मशे या ज्येष्ठ चित्रकारा खेरीज राजेश वांगड, सदाशिव मशे, अनिल वांगड, मानकी बाई, आणि शांताराम दोधडा असे काही ज्येष्ठ वारली स्त्री-पुरुष कलाकार स्वतःची निर्मिती वेगळ्या पद्धतीने सादर करू लागले आहेत. त्यांच्या कलेचे आणि विषयाचे नमुने डॉ चव्हाण यांनी आपल्या प्रबंधात सादर केले आहेत.
चार डबे आणि इंजिन असलेली आगगाडी, रेल्वे स्टेशन, दोन चाकी स्कूटर, विमान, हेलिकॉप्टर, मोटार, टेम्पो, तीन चाकी रिक्षा, ट्रक, एवढेच नव्हे तर पर देशातील भुयारी मेट्रो प्रवासाचा अनुभव देखील हे वारली कलाकार सादर करू लागले आहे
प्रागैतिक घोड्यांचे चित्र, गुहेतील प्राणी, पक्षी, तारपा नृत्य, गौरी नृत्य, कांबड नृत्य, लोककथावर आधारित चित्र, संत कबीरांच्या दोह्यावर आधारित पुस्तकाचे मुखपृष्ठ अशी अनेक प्रकारची असंख्य चित्रे सादर होऊ लागली आहेत
कलाकारांना आर्थिक लाभाचा नवा मार्ग
आता वारली कलाकारांना आर्थिक लाभाचा नवा मार्ग मिळाला आहे. रसिक संग्राहक, व्यावसायिक कलादालने, स्वयंसेवी संस्था, आणि उद्योग आस्थापना यांच्या मागणीप्रमाणे आता कला निर्मिती सुरू झाली आहे. विविध वाहने, रेल्वे यासारख्या गतिमान सुविधांमुळे विशिष्ट मर्यादित प्रदेशापेक्षा बाहेरच्या जगाचा संबंध वाढला. शहरीकरण गावा नजीक घेऊन पोहोचले. औद्योगीकरण वाढले. त्यामुळे शेती किंवा गावातील छोटे छोटे उद्योग बंद पडले. स्वयंपूर्णते ऐवजी शहरातून मिळणाऱ्या कामावर समाजाला अवलंबून राहण्याची वेळ आली अशा व्यावसायिक स्वरूपातील कलानिर्मितीला विशेष महत्त्व मिळू लागले.
याखेरीस वारली कला व्यावसायिक स्तरावर नेण्यासाठी शासकीय यंत्रणा व स्वयंसेवक संस्थांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले . त्यामुळे अनेक स्त्री-पुरुष वारली कलाकार व्यावसायिक स्वरूपाचे काम करू लागले आहेत’
कलाकारांनी चित्रातील रेषांचा ठिपक्यांचा वापर अत्यंत प्रभावीपणे करायला सुरुवात केल्यामुळे आता वेगळ्याच प्रकारची दृश्ये दिसायला लागली आहेत . शेती, पाऊस, देव, मासेमारी, नदी, आणि जलचर धान्याचं खळं, लोककथेतील सूर्य असे विषय सुरुवात हाताळायला सुरुवात केली आहे.
याचा अर्थ मात्र असा नाही की वारली कलाकारांनी परंपरागत विषय आणि कला हे पूर्णपणे टाकून दिली आहे. अजूनही चंद्रदेव, चंद्र, वाघ देव, पाच शिऱ्या देव, शिवपार्वती हे परंपरागत विषय तितक्याच सहजतेने कलाकार हाताळतात. आता अवकाशयान, लोकल ट्रेन, रेल्वे स्टेशन, मुंबईतील उंच इमारती, कारखान्याची धुराडी, शहरातील कार्यालयाचे स्वरूप, संगणक यंत्र, शहरातील जाहीर सभा, संपर्क माध्यमांचे आक्रमण, पर्यावरणाचा ऱ्हास या विषयांकडे देखील आदिवासी कलाकारांचे लक्ष गेले आहे.
प्राचीन आणि आधुनिक जीवनाचे दर्शन अत्यंत प्रभावीपणे या आदिवासी कलाकारांना आता सहज शक्य झाली आहे. याची नोंद डॉ चव्हाण यांनी आपल्या प्रबंधात केली आहे.
आपल्या नव्या प्रतीकांचा स्वीकार बहुतेक सर्व कलाकारांनी केला आहे नवे विषय आणि नवी प्रतीके वारली चित्रकलेत आली तरी शैली मात्र rपारंपरिकच राहिलेली आहे.
सध्या तरी वारली कलाकार आपल्या कलेतून नव्या जुन्या प्रतीकांचा योग्य मेळ घालीत काम करीत आहेत परंतु नव्याने येणाऱ्या प्रतीकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले तर वारली चित्रकलेच्या मूळ परंपरेला धोका होऊ शकतो की काय अशी शंका चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
पारंपरिक विषयाबरोबरच आपल्या आयुष्यातील सामाजिक समाज
आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम चित्र कला वस्तूंची निवड रंगासाठी माध्यमाची निवड असा दिसत आहे.. वारली समाज इतर भारतीय समाजाच्या जीवनाचा एकजन्सी भाग झाला आहे. त्यामुळे कलेतील ही देवाणघेवाण म्हणजेच संस्कृती संयोगाचे एक उदाहरण होऊन राहिले आहे असे मत डॉ चव्हाण असे मत यांनी आपल्या संशोधनाच्या निष्कर्षात नोंदवले आहे
Prof Sudhakar Vitthal Chavan
sudhakarvithal@gmail.com
Prof Dr Kiran Thakur
drkiranthakur@gmail.com
Comments
Post a Comment