सेंद्रिय शेतीची यशोगाथा
पुस्तक परिचय
सेंद्रिय शेतीची यशोगाथा
एका एकराची अभिनव
‘ज्ञानेश्वरी’
लेखिका: डॉ. चित्रलेखा पुरंदरे
--
विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले हे पुस्तक फक्त सेंद्रिय शेती करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त असे नाही. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा किती नव नव्या चांगल्या, प्रेरणादायी गोष्ठी -घडामोडी घडत असतात त्याचे दर्शन घडविणारे सर्वसाधारण वाचकांसाठी उपयुक्त आहे असे असे हे पुस्तक आहे.
एका अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या ज्ञानेश्वर बोडके या मुलाने स्वतःच्या हिमतीवर आणि ताकतीवर एवढे यश मिळवले याची ही कहाणी आहे. पुण्यानजीक हिंजवडी या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या भव्य औद्योगिक केंद्राशेजारी चमत्कार करून दाखविला आहे. बोडकेवाडी या छोट्या खेड्यात त्यांनी आपल्या स्वतःच्या फक्त एक एकर शेतीवर कष्ट करत करत फक्त स्वतःचीच आणि कुटुंबाचीच प्रगती केली असे नाही, तर महाराष्ट्रातील शेतीमध्ये मोठे नवीन दिशा दाखवणारे काम केले आहे. केवळ एक एकर शेतीमध्ये रोज किमान एक ते दोन हजार रुपये आपण मिळू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. राज्यातील नव्या दमाच्या शेतकऱ्याना प्रेरणा त्यांनी दिली आहे. केवळ एक एकर शेत, एक देशी गाय, कडूलिंबाचे झाड, दररोज दहा हजार लिटर पाणी आणि कष्ट करणारे दोघांचे हात याच्या जोरावर त्यांनी क्रांती करून दाखविता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे फक्त स्वतःची उन्नती करून ज्ञानेश्वर बोडके थांबले नाहीत तर त्यांनी अभिनव फार्मर्स क्लब या आपल्या या संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या आणि विविध संस्थांच्या मदतीतून प्रशिक्षण देत देत स्वतःचा आणि आपल्या परिसराचा आणि राज्याचा विकास कसा करता येईल हे त्यांनी दाखवून दिले आहे.
डॉ. पुरंदरे यांनी हे पुस्तक लिहिताना खूप मेहनत केली आहे. त्यांनी बोडके कुटुंबाची यशोगाथा रंजक स्वरूपात मांडली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचून होई पर्यंत खाली ठेववत नाही.
मी स्वतः अभिनव फार्म अभ्यासवर्गामध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या या अभ्यासक्रमांमध्ये एकात्मिक पद्धतीने सेंद्रिय कशी करावी हे, आणि मार्केटिंग पर्यंतचे सर्व टप्पे ते शिकवितात. त्या अभ्यासक्रमातील काही भाग या पुस्तकामध्ये देता आल्यास समाजाला विशेषत तरुण वर्गाला खूप चांगले मार्गदर्शन होईल असे मला प्रामाणिकपणे वाटते. डॉ. चित्रलेखा आणि श्री ज्ञानेश्वर बोडके यांनी या सूचनेचा विचार करून पुढील आवृत्तीत समावेश करावा असे मला सुचवावेसे वाटते.
--
प्रा. डॉ. किरण ठाकूर
२२.०६.२०२०
Comments
Post a Comment