पालघर केळवा शिरगाव पर्यटनाचा आगळा अनुभव
महाराष्ट्रातील पालघर हे अतिशय आकर्षक, रम्य, सुरक्षित आणि कुटुंबातील सर्वांना आवडेल असं टुरिस्ट डेस्टिनेशन का आहे हे सांगण्यासाठी हे लिहीत आहेत. त्याला आधार आहे आमच्या नात्यातील सात अगदी घनिष्ट नात्यातील कुटुंबाचा गेल्या दिवाळीतील अनुभवाचा. मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असलेले पालघर शहर, तहसील आणि जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. मुंबई या आंतरराष्ट्रीय -राष्ट्रीय विमानतळा पासून फक्त पंचावन्न किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे. पश्चिम रेल्वे, बोटीने, लोकल ट्रेन, एसटी, कार अशा सर्व साधनांनी सहज जाता येईल अशा अंतरावर हे वसलेले आहे. याचा तपशील कोणत्याही राज्य शासकीय/ पर्यटन विकास केंद्र, टुरिस्ट एजंट कडे सहज बघता येईल. या ब्लॉगपोस्ट चा उद्देश माझी निरीक्षणे आणि इतरांपेक्षा वेगळे अनुभव मुद्दाम नोंदविणे असा आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, आणि बत्तीस शिराळा (सांगली जिल्हा ) येथील सात कुटुंबातील एकूण चाळीस सदस्य आमचे ज्येष्ठ आप्त सौ सुनंदा आणि श्री भिमसिंग भामरे यांच्या बंगल्यावर दिवाळी साजरी करण्यासाठी नियोजन करून गेलो होतो. वय वर्ष सात ते ८0 या वयोगटातील...