
वानप्रस्थाश्रम आजच्या काळात वानप्रस्थाश्रम ही संकल्पना अमलात आणणे शक्य आहे का? वयाच्या पन्नाशी मध्ये शेती नव्याने शिकणे, सेंद्रिय शेतीचा-निसर्ग शेतीचा मल्टी लेवल मल्टी क्रॉपिंग प्रयोग करणे, तो यशस्वी करून दाखवणे शक्य आहे का? या प्रश्नाची प्रश्नांची उत्तरे “हो” आहेत, हे मध्य प्रदेश मधील नर्मदा खोऱ्यात एका खेड्यात सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्याने करून दाखवले आहे. ही कथा आहे आडवाटेला असलेल्या खरगोन जिल्ह्याच्या मोगावा या गावच्या यज्ञ दत्त शर्मा आणि सौभाग्यवती आराधना शर्मा या दाम्पत्याची. नर्मदा मैया च्या खोऱ्यात त्यांचं हे मोगावा गाव नदीपात्रापासून जवळच आहे. नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना नव्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले. त्या क्षेत्रात लेपा पुनर्वास या नवीन गावाला लागून मोगावा हे गाव आहे. तसे हे कुटुंब मूळचे शेतकरीच. पण पिताजींनी निमाड परिसरात सुरू केलेल्या प्राथमिक/माध्यमिक शाळेचा विस्तार यांनी वाढवला. शेती मागे पडली. शर्माजींची पन्नाशी उलटली तेव्हा त्यांनी निवृत्ती घेऊन आपल्या गावच्या शेतीवर प्रयोग करायचे ठरवले. एकुलत्या एक कन्येच्या - श्...