गोविंदराव टेंबे रचित ‘जयदेव’ संगीतिकेचे अभिगायन
15.1.2023 “जयदेव’ संगीतिका ही गोविंदराव टेंबे यांची एक अद्भुतरम्य कलाकृती आहे.” अशी ओळख या संगीतिकेची करून दिली आहे. काहीशा अविश्वासाने आपण हे निवेदन वाचू लागतो आणि संगीतिका पाहू/ऐकू लागतो.. निदान माझे तरी तसे झाले होते. नाट्यगृहातून बाहेर पडल्या नंतर मात्र ती खरोखरच कशी केवळ अद्भुतरम्यच नाही तर अविस्मरणीय कलाकृती आहे, हे न कंटाळता ज्याला त्याला सांगू लागतो. माझे तसे झाले. ही संगीतिका प्रथम १९५४ साली आकाशवाणीवर केवळ श्रव्य स्वरूपात सादर झाली. नंतर कोल्हापूर येथे १९६२ मध्ये तिचा नाट्यप्रयोग झाला. त्यानंतर १९७३ आणि १९७४ मध्ये नाट्यप्रयोग झाले. वर्ष १९७४ नंतर या कलाकृतीचा आविष्कार झाला नव्हता. आता एकदम २०२३ च्या जानेवारी सहा रोजी या संगीतिकेचे सादरीकरण झाले. ती नेटकेपणे सादर केल्या बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) व भीमसेन जोशी अध्यासनाचे आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत. या १९७४ सालच्या प्रयोगात नायकाचे - जयदेवाचे- काम करण्याऱ्या पंडित सुधीर पोटे यांना तर अद्भुतपणाचे श्रेय मुख्यत: आणि भरभरून दिले पाहिजे. त्यांना...